महत्वाच्या बातम्या

 रेगडीगुटा व कोइंदुळमध्ये महिला विश्रांती व आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी


- महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानासाठी निधी मंजूर करा; गावकरी महिलांची भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या रेगडीगुटा व कोइंदुळ या आदिवासी गावांमध्ये महिलांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि सन्मानासाठी आधुनिक सुविधायुक्त महिला विश्रांती व आरोग्य केंद्र (Mahila Visava Kendra) उभारण्यात यावे, अशी मागणी गावातील महिलांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने भाकपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन्ही गावांमध्ये केंद्रांच्या बांधकामासाठी शासकीय निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एटापल्ली तालुका हा दुर्गम आणि आदिवासीबहुल भाग असून अनेक गावांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना विविध सामाजिक रूढी-परंपरांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र कुरमाघरे असली, तरी तेथे पिण्याचे पाणी, शौचालय, स्नानगृह, वीज आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मासिक पाळी ही नैसर्गिक जैविक प्रक्रिया असून या काळात महिलांना स्वच्छ वातावरण, आवश्यक विश्रांती आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार असून कोणत्याही महिलेला मासिक पाळीच्या काळात सक्तीने घराबाहेर राहण्यास भाग पाडले जाऊ नये. महिलांच्या संमतीचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर राखून महिला विश्रांती केंद्रांची उभारणी करावी, अशी भूमिका भाकपने मांडली आहे.

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पोर्टलवर ५ मे २०२२ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील ‘Kurma Ghar to Mahila Visava Kendra’ या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.

जिल्हा प्रशासन आणि UNICEF महाराष्ट्राच्या तांत्रिक सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सुरुवातीला २३ महिला विश्रांती केंद्रांसाठी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा संदर्भ निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर दुर्गम आदिवासी गावांमध्येही अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेगडीगुटा व कोइंदुळ या दोन्ही गावांमध्ये स्वतंत्र महिला विश्रांती व आरोग्य केंद्रे बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करावा. केंद्रांमध्ये स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वीज, प्रकाशव्यवस्था, विश्रांतीसाठी आवश्यक साहित्य आणि मासिक पाळी स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आरोग्य विभागामार्फत नियमित आरोग्य तपासणी, सॅनिटरी पॅड वितरण आणि वैज्ञानिक जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

केंद्रांच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समिती, आदिवासी उपयोजना आणि पात्र शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता तपासावी. ग्रामसभा, महिला बचत गट आणि स्थानिक महिलांचा सहभाग घेऊन केंद्रांचे व्यवस्थापन व देखभाल करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांची भूमिका : आदिवासी महिलांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मान हा सार्वजनिक आरोग्य व महिला सक्षमीकरणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुर्गम भागातील महिलांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये. शासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेगडीगुटा व कोइंदुळ येथे महिला विश्रांती व आरोग्य केंद्रे मंजूर करावीत आणि प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार, AIYF महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष आणि कॉम्रेड सुरज जक्कुलवार यांच्या माध्यमातून महिलांच्या या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.





  Print






Related Photos