महत्वाच्या बातम्या

 कत्तलीच्या दारात पोहोचलेल्या तीन गोवंशांना जीवदान : रामनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कत्तलीसाठी घरात डांबून ठेवलेल्या तीन गोवंशांचा जीव वाचवण्यात रामनगर पोलिसांना यश आले. रय्यतवारी कॉलरी परिसरातील डिस्पेन्सरी चौकात पोलिसांनी छापा टाकून दोन गायी आणि एका गौ-हाची सुटका केली. या कारवाईत गोमांसासह कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर शहरात गोवंशांची अवैधरित्या कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी रामनगर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाकडून अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर लक्ष ठेवण्यात येत होते.

दरम्यान, रय्यतवारी कॉलरी येथील डिस्पेन्सरी चौक परिसरात अब्दुल गणी शेख ईस्माईल कुरेशी ४९ वर्षे याने आपल्या घरात गोवंश कत्तलीसाठी डांबून ठेवले असून गोमांस विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी छाप्याचे नियोजन केले.

१८ सप्टेंबर रोजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक संबंधित घरावर पोहोचले. पंचांसमक्ष झडती घेतली असता घरात गोमांस, वजनकाटा, सत्तुर, लाकडी कुंडा आणि अन्य साहित्य आढळून आले. त्याच ठिकाणी कत्तलीच्या भीतीच्या सावटाखाली असलेल्या दोन गायी आणि एका गौ-हाचीही पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिन्ही गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन मुक्या जीवांना ऐनवेळी जीवदान मिळाले. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ९३ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अब्दुल गणी शेख ईस्माईल कुरेशी याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस हवालदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी केले.





  Print






Related Photos