राजुरात एटीएम फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : कार्ड बदलून सेवानिवृत्ताच्या खात्यातून हजारो रुपये लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या एटीएम कार्डची अनोळखी व्यक्तीने चलाखीने अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ३७ हजार ८०० रुपये काढल्याची धक्कादायक घटना राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये घडली. या प्रकरणी श्रीहरी नारायण ठमके (वय ६३), रा. अंबादास वॉर्ड, राजुरा यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ठमके हे सेवानिवृत्त असून कुटुंबासह राजुरा येथे राहतात. सोमवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता कौटुंबिक कामासाठी पैसे काढण्याच्या उद्देशाने ते आसिफाबाद रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये गेले होते. एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघत नव्हते.
त्यावेळी एटीएममध्ये दोन व्यक्ती उपस्थित होते. काही वेळाने आणखी एक अनोळखी व्यक्ती तेथे आला. एटीएममध्ये कधीकधी तांत्रिक अडचण येते, असे सांगून त्याने ठमके यांना एटीएम कार्ड पुन्हा मशीनमध्ये टाकण्यास सांगितले. तसेच पिन क्रमांक टाकण्यास सांगितले. मात्र, पैसे निघाले नसल्याने ठमके एटीएम कार्ड घेऊन घरी परतले.
घरी आल्यानंतर काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. १० हजार रुपयांचे तीन व्यवहार आणि ७ हजार ८०० रुपयांचा एक व्यवहार अशा चार व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून एकूण ३७ हजार ८०० रुपये काढण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली.
बँक कर्मचाऱ्यांनी ठमके यांच्याकडील एटीएम कार्ड तपासले असता ते त्यांच्या खात्याशी संबंधित कार्ड नसल्याचे स्पष्ट झाले. एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी व्यक्तीनेच एटीएम कार्डची अदलाबदल केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विक्की निर्वाण करीत आहेत.




Petrol Price




