बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अवैध दारूची तस्करी उघड : दोन महिलांकडून २१ हजारांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वे मार्गे अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध रेल्वे पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही महिला आरोपींना नोटीस देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, १६ जून रोजी दुपारी सुमारे १.४० वाजताच्या सुमारास बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वे पोलीस गस्ती वर असताना दोन महिला संशयास्पद हालचाली करत ट्रेन क्रमांक १६०९४ लखनौ–चेन्नई एक्स्प्रेसच्या एस-७ डब्यात चढताना आढळल्या. संशय आल्याने पोलिसांनी त्यांना खाली उतरवून त्यांच्या बॅग व पिशव्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान आरोपी शहादा शरीफ खान (३५), रा. कोयवाडा, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली हिच्याकडून ९० मिली क्षमतेच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या २५० सीलबंद पाऊचचा साठा आढळून आला. या मालाची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
तसेच दुसरी आरोपी पदमा रमेश कांबळे (४५) , रा. कोयवाडा, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली हिच्याकडून त्याच कंपनीच्या २४० पाऊच जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपींकडून दारूचा साठा, बॅग व पिशव्या असा एकूण २१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई पंकज भांगे यांच्या फिर्यादीवरून रेल्वे पोलीस ठाणे वर्धा येथे अप.क्र. १५७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) व ६६(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक वासनिक, पोअं पंकज भांगे मपोअं कीर्ती मिश्रा यांनी केले प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सुखदेव हे करीत आहेत.
रेल्वे मार्गाचा वापर करून अवैध दारूची वाहतूक करण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलीस आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. बल्लारशाहसारख्या महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनवर तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
News - Chandrapur




Petrol Price




