गुरू हे शुद्ध ज्ञानतत्त्व : हाडामासाचा नव्हे – मोरेश्वर मडावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जानगर येथील श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ज्येष्ठ संगीत शिक्षक मोरेश्वर मडावी यांनी गुरू हा हाडामासाचा नसून शुद्ध ज्ञानतत्त्व आहे. गुरू जाती-संप्रदायाचा नसून तो अनुभवातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा स्रोत आहे, असे प्रतिपादन केले.
मडावी म्हणाले, खऱ्या गुरूचे ज्ञान लाभल्याने मनुष्याचे मन विश्वाकार होते. गुरूच्या नित्य चिंतनातून मनुष्य उन्मन अवस्थेकडे वाटचाल करतो. सुख-दुःखाच्या पलीकडे नेणारे गुरुतत्त्वच जीवनाला उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचवते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथाच्या माध्यमातून हेच ज्ञान समाजापर्यंत पोहोचविले असून, समाजाला खऱ्या गुरुतत्त्वाची आज अधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन व्यसनमुक्ती प्रबोधनकार मारोती साव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अशोकराव धमाणे होते. यावेळी गोपाळ शिरपूरकर, श्री गुरूदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष रामदास तुमसरे, श्री गुरूदेव सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली डुडुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात वैशाली डुडुरे यांनी महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ कवी तथा ग्रामगीताचार्य गोपाळ शिरपूरकर यांनी मोझरी येथील श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामगीताचार्य परिषदेची सविस्तर माहिती देत आपल्या कवितांमधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नवनियुक्त महिला कार्यकारिणीचाही सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अशोकराव धमाणे यांनी गुरुतत्त्वाचे महत्त्व विशद करत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोईनकर व खेमदेव कन्नमावर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामदास तुमसरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष मुरलीधर कौरसे, कोषाध्यक्ष हरीचंद्र देवतळे, देवराव कोंडेकर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महिला व पुरुष सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
News - Chandrapur




Petrol Price




