महत्वाच्या बातम्या

 मार्कंडात विकासकामांना गती द्यावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव ता.चामोर्शी येथील ऐतिहासिक व धार्मिक स्थळाच्या विकासासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. वैनगंगा नदी घाटावर वर्षभर लाखो भाविक व पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता, येथे आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी २१ जुलै रोजी नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांना पत्र पाठविले आहे.

या कामाबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याची विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे. मार्कंडादेवच्या वैभवशाली मंदिर परिसरातील वैनगंगा घाटावर आवश्यक सुविधा नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

घाटावर पक्क्या व सुरक्षित पायऱ्यांची उभारणी, महिला भाविकांसाठी स्वतंत्र वस्त्रपरिवर्तन कक्ष, नदीपात्रात सुरक्षेसाठी लोखंडी कठडे, धोकादायक पाणीपातळी दर्शविणारे सूचना फलक, हायमास्ट दिव्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावांमुळे मार्कंडा घाटावरील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी -

मार्कंडा येथील मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थाचे पदाधिकारी संतोष सुरपाम यांनी यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात मार्कंडादेवला राष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करून सर्वांगीण विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मार्कंडादेव येथे वर्षभर तसेच महाशिवरात्रीच्या काळात विदर्भासह राज्यभरातून लाखो भाविक दाखल होतात. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील या ऐतिहासिक स्थळी आजही आवश्यक पर्यटन व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos