महत्वाच्या बातम्या

 हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात काही ठिकाणी हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे बारकाईने निरिक्षण करुन घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. या किडीची मादी पतंग पाने, कोवळ्या शेंड्या, कळ्या व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दान्यासारखी दिसतात. त्यातून 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवसर पांढूरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण  पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलो-यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करुन आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.

हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन : शेतामध्ये प्रति हेक्टरी 20 बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे तयार करुन लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्यांचा वापर करावा. यासाठी घाटेअळीचे कामगंध एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावे. यासाठी शेतक-यांनी पिकाचे निरिक्षण करुन किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर 1 ते 2 अळ्या प्रति मीटर ओळ आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिके फुलो-यावर आल्यानंतर घाटे अळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात कराव्या. 50 टक्के फुलोरावर असतांना पहिली फवारणी करावी. निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपिव्ही 500 एलई हे किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी, 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. त्यात इमामेकटीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 3 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 टक्के  एस.सी. 2.5 मिली प्रति 10 लीटर पाण्यात फवारणी करावी. औषधांच्या मात्रा नॅकसॅक या साध्या पंपासाठी आहेत. जे शेतकरी बॅटरी ऑपरेटेड पंप वापरतात त्यांनी औषधाची मात्रा दुप्पट करावी आणि जे शेतकरी पॉवर ऑपरेटेड स्प्रेपंप वापरतात त्यांनी औषधाची मात्रा तिप्पट करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos