महत्वाच्या बातम्या

 एसटी संगे तीर्थाटन उपक्रमाचा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातर्फे “एस.टी. संगे तीर्थाटन” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक  निलेश शे. बेलसरे यांनी केले आहे.

१७ मे २०२६ पासून अधिक मास (ज्येष्ठ मास) सुरू झाला असून पुढील एक महिन्याच्या कालावधीत विवाह तिथी नसल्याने तसेच शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांचा कल धार्मिक व पर्यटन स्थळांकडे वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर२५ मे २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत ड्रॅगन पॅलेस कामठी, दीक्षाभूमी नागपूर, रामटेक, माहूर, शेगाव, चिखलदरा, शिर्डी, शिंगणापूर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी, गणपतीपुळे, अष्टविनायक दर्शन आदी धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार इतर इच्छित स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे.

किमान ४० प्रवाशांच्या समूहास संपूर्ण महाराष्ट्रात एस.टी.च्या नियमित दरात कोणताही अतिरिक्त अधिभार न देता तीर्थाटन व पर्यटन करता येणार आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना, १२ वर्षांखालील बालकांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तर दिव्यांग प्रवाशांना ७५ टक्के सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या उपक्रमासाठी नव्या लालपरी बसांचा वापर करण्यात येणार असून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळापासून इच्छित स्थळापर्यंत, इच्छित दिवशी व इच्छित वेळी नियमाधीन दरात प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.

नागरिकांनी किमान ४० प्रवाशांचा समूह तयार करून जाहिरात पत्रकातील संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून “एस.टी. संगे तीर्थाटन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos