महत्वाच्या बातम्या

 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रकल्प अधिकाऱ्यांचा दिलासा


- समस्या सोडविण्याचे आश्वासन : आश्रमशाळा संघटनेने सादर केले मागण्यांचे निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत आश्रमशाळेतील चतुर्थश्रेणी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत दिलासा दिला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

Centre of Indian Trade Unions (CITU) संलग्नित आदिवासी विकास चतुर्थश्रेणी व रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संतोष धोटे व राधेश्याम पत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवार, ११ जून रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामुळे प्रकल्पातील चतुर्थश्रेणी व रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर झालेल्या चर्चेत प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी सर्व मागण्या काळजीपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्या क्रमाक्रमाने समजून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. काही मागण्या वरिष्ठ कार्यालयाच्या स्तरावर असल्याने त्याबाबत योग्य पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या -
सादर करण्यात आलेल्या निवेदनात अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये गणवेश न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने गणवेश उपलब्ध करून देणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देणे, चौकीदार कर्मचाऱ्यांना गमबूट, टॉर्च व छत्री यांसारखी आवश्यक साधने देणे यांचा समावेश आहे.

तसेच प्रत्येक आश्रमशाळेत महिला चौकीदार व महिला सफाईगार यांची नियुक्ती करण्यात यावी, १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर प्रतिदिन ५६१ रुपये मजुरी दर लागू करावा, २०० विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना नियमानुसार अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यात यावे, या प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, अशीही ठोस मागणी संघटनेने केली आहे.

शिष्टमंडळाची उपस्थिती -
निवेदन सादर करताना शिष्टमंडळात सुभाष देवाजवार, कविता मेश्राम, घनश्याम मोहरले, बाबूदास हलामी, विजू मानकर, रविना दहागावकर, महेंद्र नंदेश्वर यांच्यासह मोठ्या संख्येने चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होते.

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांबाबत आशा निर्माण झाली असून पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos