बगडखिडकीत गांजा विक्रीवर रामनगर पोलिसांचा छापा : ५९ वर्षीय महिला अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील बगडखिडकी परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध रामनगर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत तिला अटक केली. या कारवाईत तिच्या ताब्यातून ०.३३३ किलो गांजा जप्त करण्यात आले.जयरून नीसा इस्त्राईल खान पठाण (वय ५९) रा. नुरी चौक, बगडखिडकी चंद्रपूर असे आरोपी महिलेचे नाव आहे.
जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
या दरम्यान, बगडखिडकी येथील नुरी चौक परिसरात राहणारी जयरून नीसा इस्त्राईल खान पठाण (वय ५९) ही तिच्या राहत्या घरातून अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीची खातरजमा करून तिच्या घरावर छापा टाकण्यात आला.
झडतीदरम्यान महिलेच्या ताब्यातून ०.३३३ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून गांजा जप्त केला आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८९७/२०२६ अन्वये कलम ८(क) व २०(ब)(ii), एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या महिलेला न्यायालयात हजर केले असता ६ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिच्याकडे गांजा कोणाकडून आला, त्याची खरेदी-विक्री कोणाच्या माध्यमातून केली जात होती आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास रामनगर पोलीस करत आहेत.
सदर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, स.पो.नि. मानकर, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार डेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे व ब्ल्यूटी साखरे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




