भंडारा : कोरंभीत बिबट्याचा हल्ला : ११ शेळ्या ठार, गावात भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / पवनी : तालुक्यातील कोरंभी गावात जंगलातून गावात शिरलेल्या बिबट्याने गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करत मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यात पशुपालक गुरुदास सुदामे यांच्या मालकीच्या ११ शेळ्या ठार झाल्या असून तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रात्रीच्या सुमारास सुदामे यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरला आणि बांधलेल्या शेळ्यांवर अचानक हल्ला केला. काही क्षणांतच त्याने अनेक शेळ्यांना ठार केले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. वन परिक्षेत्राधिकारी वृषाली नागदेवे आणि क्षेत्र सहाय्यक वैशाली सोंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट गार्ड डेव्हिड मेश्राम, राजाराम राठोड तसेच रॅपिड अॅक्शन टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
वन विभागाकडून नियमानुसार बाधित पशुपालकाला नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरंभी व आसपासच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे.
News - Bhandara




Petrol Price




