महत्वाच्या बातम्या

 आला पावसाळा, आरोग्य सांभाळा; जलजन्य आजारांपासून घ्या काळजी : आरोग्य विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पावसाळ्याच्या हंगामात दूषित पाणी, अस्वच्छ परिसर तसेच अन्नपदार्थांच्या दूषिततेमुळे अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, कॉलरा, टायफॉईड आणि कावीळ यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जलजन्य आजारांचा प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी व अन्नपदार्थांद्वारे होतो. सांडपाण्याचे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये झिरपणे, पाईपलाईन गळती, पाणी शुद्धीकरणातील अनियमितता, स्त्रोतांजवळील अस्वच्छता, क्लोरीनयुक्त औषधांचा अपुरा साठा अथवा अयोग्य साठवणूक यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते.

नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे. शिळे व उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे. घर व परिसर स्वच्छ ठेवून माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. लहान मुले व गरोदर महिलांना उकळून थंड केलेले पाणी द्यावे. गावातील पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण होत आहे की नाही याची खातरजमा करावी. अस्वच्छ हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी खाणे-पिणे टाळावे तसेच बाहेरील बर्फाचा वापर करू नये. प्रवासादरम्यान स्वतःचे पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

जलजन्य आजारांचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये वर्षातून दोन वेळा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. आढळलेल्या त्रुटींबाबत ग्रामपंचायतींना अवगत करून त्यांची पूर्तता करण्यात येते.

आरोग्य कर्मचारी गृहभेटीद्वारे साथरोग सर्वेक्षण करतात. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधील गळती, नियमित क्लोरिनेशन, स्त्रोतांची स्वच्छता आणि जनजागृतीसाठी ग्रामसभा व गटसभांमध्ये नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. तसेच साथरोग प्रतिबंधाबाबत नियमित आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना राबविल्या जातात.

साथरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी १ जून २०२६ पासून जिल्हास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला असून साथरोग औषधी किटही तयार ठेवण्यात आल्या आहेत. २४ तास कार्यरत साथरोग व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.

पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नपदार्थांमुळे जलजन्य आजारांचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी पिणे, स्वच्छतेची काळजी घेणे तसेच अतिसार, उलट्या, ताप किंवा कावीळ यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य संस्थेत वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत. जलजन्य आजारांपासून बचावासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सचिन चव्हाण तथा जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos