महत्वाच्या बातम्या

 अड्याळ येथे कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पवनी (भंडारा) : तालुक्यातील अड्याळ येथील भाटपुरी वॉर्डात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ३८ वर्षीय नंदकिशोर वातुजी देशमुख यांनी राहत्या घरी सिलिंग फॅनला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २३ मे रोजी दुपारी अंदाजे २:१० वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दारूचे व्यसन आणि कौटुंबिक कलह -
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नंदकिशोर यांना दारू पिण्याची वाईट सवय होती. याच व्यसनातून त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत वारंवार वाद होत असत. घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसताना, नंदकिशोर यांनी घरात एकटे असल्याचा फायदा घेतला. त्यांनी घरातील सिलिंग फॅनला दुपट्टा बांधून गळफास लावला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांत तक्रार दाखल -
या संदर्भात गजानन वातुजी देशमुख यांनी तातडीने अड्याळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गजानन देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी मर्ग (अकस्मात मृत्यू) नोंद केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास अड्याळ पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार मडावी करीत आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos