सुगंधित तंबाखू रॅकेटचा गडचिरोली कनेक्शन उघड : ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील मौजा रयतवारी येथे मशीनच्या साहाय्याने बनावट व प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीनंतर या संपूर्ण अवैध रॅकेटचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्याचा मोठा खुलासा झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाने गुरुवारी ११ संयुक्त कारवाई करत या कारखान्यावर छापा टाकला होता. या कारवाईत ११.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विजय भीमाजी भांडेकर (वय ३३, रा. सामदा बु.) याला अटक करण्यात आली.
चौकशीतून धक्कादायक खुलासा -
अटक आरोपी विजय भांडेकर याची कसून चौकशी केल्यानंतर या अवैध व्यवसायामागील संपूर्ण नेटवर्क उघड झाले आहे. तपासात समोर आले की, बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी लागणारा खुला सुगंधित तंबाखू, होला व इगल ब्रँडची हुक्का शिशा तंबाखू तसेच पॅकिंग साहित्य हे सर्व गडचिरोली जिल्ह्यातील गोकुळनगर येथील व्यावसायिक विनय गुप्ता याच्याकडून पुरवले जात होते. या कबुलीनंतर या रॅकेटचे केंद्र गडचिरोली असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधार विनय गुप्ता याचा शोध सुरू केला आहे.
मोठ्या ब्रँडच्या नावाने बनावट विक्री -
धाडीदरम्यान रयतवारी येथील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बेकायदेशीर पॅकिंग सुरू असल्याचे निष्पन्न झाले. ही सुगंधित तंबाखू नामांकित ब्रँडच्या नावाने बनावट पॅकिंग करून बाजारात विकली जात असल्याचेही समोर आले आहे. मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणारी ही तंबाखू मोठ्या प्रमाणावर वितरित केली जात असल्याने यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
संयुक्त पथकाची कारवाई -
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, अन्न सुरक्षा विभाग आणि सावली पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. पोलिस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आणि सावलीचे पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई पार पडली. या पथकात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते.
यामध्ये एपीआय दीपक काँक्रेटवार, एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय विनोद भुरले, पीएसआय संतोष निंभोरकर, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कापगते, कुणाल मुडे, पीएसआय सर्वेश बेलसरे, धनराज करकडे, गणेश भोयर, चेतन गज्जलवार, संतोष येलपूलवार यांचा समावेश होता.
पुढील तपास सुरू -
या संपूर्ण प्रकरणात गडचिरोलीतील पुरवठा साखळी आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून, लवकरच संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




