महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील पहिल्या महाआरोग्य शिबिराचे आज आरोग्य मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन



- २२ ते २४ जुलै तीन दिवस विनामुल्य तपासणी व चाचण्या

- महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष, शिबिराची तयारी पुर्ण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात चार ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले शिबिर २२ ते २४ जुलै दरम्यान पार पडणार असून उद्या २२ जुलै रोजी बच्छराज धर्मशाळा, वर्धा येथे या शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्यासह खासदार डॉ.अनिल बोंडे, खासदार अमर काळे, आ.डॉ.मनीषा कायंदे, आ.अभिजित वंजारी, आ.सुधाकर अडबाले, आ.अरुण लखानी, आ.रवींद्र चव्हाण, आ.समीर कुणावार, आ.राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्यावर्षी जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान राबविण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षी आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी येथे महा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्धा येथून या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. बच्छराज सभागृह, वर्धा येथे आयोजित या पहिल्या शिबिराची तयारी पुर्ण झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप, दिव्यांगांना साहित्य वितरण तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्ड नोंदणी व लाभार्थी सहाय्य केंद्रही कार्यरत राहणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून नोंदणीपासून उपचार व औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिराच्या ठिकाणी एकून २२ दालने उभारण्यात आली आहे. नागरिकांनी शिबिरात आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos