इथल्या मातीचा कण न कण माझ्या रक्तात आहे : पद्मश्री डॉ. परशुराम खुणे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : माझे जीवन बदलले गेले ते याच संस्थेमुळे इथला कण न कण माझ्या रक्तात आहे. देव बघितला नाही, मात्र बालाजी पाटलाच्या रूपाने देवमाणूस जरूर बघितला. बालाजी पाटील म्हणजे विद्यापीठ. त्यांची सावली माझ्यावर पडली हे माझे भाग्य. त्यांच्या नावाने दिलेला पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च आहे. हा पुरस्कार माझ्या शाळेला अर्पण करतो, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी केले. स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठिनच्या जीवन गौरव पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. स्थानिक भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांच्या स्मृती सोहळ्याच्या निमित्याने जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
या स्मृती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. प्रशांत आर्वे हे होते. प्रमुख भाषणात ते म्हणाले की, बालाजी पाटील जे आयुष्य जगले त्यातून आपण प्रेरणा घेत असतो. देश मोठा होतो. सामान्य माणसाच्या सकारात्मक विचारातून माणूस कोणत्या भागातून येतो ते महत्वाचे नसते तर माणूस काय करतो हे महत्वाचे असते. बालाजी पाटलानी जमिनीवर राहून कामे केलीत. त्याची प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे.
हजारो विद्यार्थी तथा निमंत्रितांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्यात तथा विद्यापीठात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. हेमंतकुमार मेश्राम यांचा त्यांना आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल आणि प्राचार्य अतुल कामडी यांचा त्यांच्या चित्रकलेतील आंतरराष्ट्रीय स्थरावरील योगदानबद्धल गौरव करण्यात आला. यावेळी नवीन वर्षाच्या कलात्मक दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव सदानंद बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन अध्यक्ष जयंतराव बोरकर यांनी केले. प्रा. विष्णू बोरकर आणि प्रा. दुर्गेश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
News - Chandrapur