प्रत्येक गावात लोकसहभागातून श्रमदानाने वनराई बंधारे बांधण्याची मोहिम
- नागरिकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सद्यस्थितीत ओढे व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सद्या पावसाळा संपला असल्याने ओढे व नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी अडवून रब्बी हंगामातील पिकांना संरक्षित पाणी देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे, तसेच दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होण्याकरीता लोकसहभागातून श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहिम कृषि विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे. मोहिमेत सहभाग नोंदवून प्रत्येक गावाने वनराई बंधारे बांधून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यकाशी संपर्क साधून लोकसहभाग घेऊन श्रमदानाने बंधारे बांधून गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढवावी. हे बंधारे बांधण्याकरीता रिकाम्या गोण्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रिकाम्या गोण्यामध्ये नाल्यातील गाळ भरुन कृषि सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य गोण्यांची रचना करुन वनराई बंधारे बांधता येतील. यामुळे सरासरी 2 हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचन उपलब्ध होईल. काही ठिकाणी अधिकचा पाणीसाठा होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकेल. वनराई बंधाऱ्यांच्या आजुबाजुच्या विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरीता मदत होईल व वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यामधून पाण्याचा उपसा करुन रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्ये यासारखी पिके घेण्यासाठी करता येईल. याशिवार वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरीता व गुरांना पाणी पिण्याकरीता करता येणार आहे. वनराई बंधाऱ्याचे महत्व बहुमोल असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी लोकसहभागातून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह कृषि यंत्रणेस सहकार्य करावे, असे कृषि विभागाने कळविले आहे.
News - Wardha