महत्वाच्या बातम्या

 बामणी टी-पॉईंट येथे भीषण अपघात : ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील टी-पॉईंट परिसरात सोमवारी २० सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.

या अपघातात रुपेश संजय भोयर १८ वर्ष अमित नगर याचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रशेखर दयानंद कस्तुरे आणि विशाल उमेश खामनकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघेही मित्र बल्लारपूर येथील अमित नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र बामणी टी-पॉईंट परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते. तेथून दुचाकीने परत येत असताना त्यांनी समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम ९४२२ च्या मागील चाकाखाली गेले. या भीषण अपघातात रुपेश भोयर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करून अपघातांवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos