महत्वाच्या बातम्या

 भांडी चमकविण्याच्या बहाण्याने सोन्याची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वरोरा पोलीसांनी केला पर्दाफाश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भांडी चमकवून देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात बिहार राज्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरोरा येथील वाल्मिकी वॉर्ड निवासी नथ्थू साधोजी दडमल (वय ६२) यांनी २ जून २०२६ रोजी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दोन अनोळखी इसम त्यांच्या घरी आले आणि पितळ, तांबे व स्टीलची भांडी चमकवून देण्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ चमकविण्यासाठी घेतला. त्यानंतर घरातील गॅसवर डबा ठेवण्याचा बहाणा करून आरोपींनी हातचलाखीने सोन्याचा गोफ लंपास केला आणि तेथून पसार झाले.

या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान वरोरा शहरासह चंद्रपूर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चंद्रपूर शहरातील एका भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन दिवस आरोपींवर पाळत ठेवून वरोरा पोलिसांच्या पथकाने शिताफीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.

अटकेत घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. आरिफ मो. बरखत अली (४२), निर्दोष बद्रीप्रसाद गुप्ता आणि पंकजकुमार सुखदेव शाहा (४३) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी वरोरा, बल्लारपूर, सावली, घुग्घुस, राजुरा तसेच इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपींकडून १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ, सोन्याचे डोरले, मणी, कानातले, चार सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याचे डोरले तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस हवालदार नितीन रायपुरे, सुकराज यादव, नवधरे, नागोस, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर, सौरभ कुलये, मनोज ठाकरे, महेश गावतुरे व इतर कर्मचाऱ्यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos