पेपरफुटी आणि लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्यात युवकांचा विराट मोर्चा

- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि पेपरफुटीच्या घटनांविरोधात गुरुवारी भंडारा शहरात युवकांनी विराट मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत काढलेल्या या मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. भंडारा बंदचे आवाहन करत शहरातून निघालेल्या या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
दुपारी १२ वाजता लालबहादूर शास्त्री चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले युवक-युवती, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांनी वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
काही युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा सोबत आणल्या होत्या. व्यापारी व दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
विविध पक्ष आणि संघटनांचा सहभाग -
या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी सहभाग नोंदविला. कॉंग्रेस, भीम आर्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटन, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, एकलव्य सेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आझाद समाज पार्टी कांशीराम, भारतीय बौद्ध महासभा, महिला संघटना, सामाजिक संस्था तसेच विविध युवक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम -
मोर्चाच्या वेळी पाऊस सुरू असतानाही आंदोलकांचा उत्साह कायम होता. अनेकांनी रेनकोट आणि छत्र्यांचा आधार घेत मोर्चात सहभाग घेतला. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलनात सहभाग नोंदविला.
मोर्चा त्रिमूर्ती चौकात पोहोचल्यानंतर युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी युवकांनी जोशपूर्ण भाषणे देत पेपरफुटी आणि युवकांवरील कारवाईचा निषेध केला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासनाला निवेदन सादर केले.
भंडारा बंदला संमिश्र प्रतिसाद -
आंदोलकांनी गुरुवारी भंडारा बंदचे आवाहन केले होते. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मोर्चाच्या मार्गावरील काही दुकाने व प्रतिष्ठाने काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती; मात्र नंतर अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू झाले.
मोर्चा सुरू झाल्यानंतर काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली, तर काही शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती.
पवनीत सर्वपक्षीय निषेध मोर्चा -
दिल्लीतील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पवनी शहरातही गुरुवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या वेळी मोहन पंचभाई, धर्मेंद्र नंदरधने, शंकरराव तेलमासरे, मोहित मोहरकर, श्रावण लांजेवार, सय्यद तबरेज, मीना जिभकाटे, नितीन तलमले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
साकोलीत बंदला प्रतिसाद -
साकोली शहरातही दिल्लीतील लाठीहल्ला, पेपरफुटी प्रकरण आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चा काढण्यात आला. बसस्थानक परिसरातून सुरू झालेला मोर्चा जुन्या तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे झालेल्या सभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
News - Bhandara




Petrol Price




