विद्युत खांबावर काम करताना शॉक : २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

- बोरी येथील दुर्घटनेनंतर अनधिकृत कामगारांकडून विद्युत कामे करून घेतल्याची चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अहेरी तालुक्यातील बोरी येथील २० वर्षीय युवकाचा विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या घटनेनंतर विद्युत विभागातील काही लाईनमनकडून रोजंदारीवर युवकांकडून धोकादायक कामे करून घेतली जात असल्याची बाब चर्चेत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर मस्तान शेख (वय २०(, रा. बोरी, ता. अहेरी हा युवक गुरुवारी सकाळी गावात विद्युत खांबावर लाईट लावण्याचे काम करीत असताना त्याला विद्युत शॉक लागला. शॉक बसल्याने तो खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारानंतर बल्लारपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात काही लाईनमन नियमितपणे युवकांना रोजंदारीवर घेऊन विद्युत दुरुस्ती व देखभालीची कामे करून घेतात. अनेकदा हे युवक आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय आणि अधिकृत प्रशिक्षणाशिवाय विद्युत खांबांवर चढून काम करीत असल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या वेळीही संबंधित युवक चालू विद्युत प्रवाह असलेल्या लाईनवर काम करीत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेमुळे विद्युत विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित कामासाठी अधिकृत परवानगी, सुरक्षा उपाययोजना आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून चौकशीनंतरच मृत्यूमागील नेमकी कारणे आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.
बोरी परिसरातील या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




