कोटगुल एल्गार सभेचा सरकारला इशारा : अधिकाऱ्यांनाच दिले मागण्यांचे निवेदन


- अवैध रिव्हॉल्वर, कॅसिनो, आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू आणि पाचवी अनुसूची भंग करणाऱ्या घुसखोरांवर कारवाईची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोटगुल येथील बाजार चौकात आज पार पडलेल्या शेतकरी-शेतमजूर व विकास परिषद एल्गार सभेचा शेवट केवळ भाषणांनी नाही, तर थेट कृतीने झाला. सभेत मांडलेल्या सर्व १६ प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना समक्ष देण्यात आले.
भगवान बिरसामुंडा स्मारक चौक ते बाजार चौकापर्यंत देशी दारू हटाव, कोटगुल परिसर बचावच्या घोषणांनी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या या सभेला विनोद कोरेटी (तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, कोरची), अनिल केरामी (संयोजक, घोटुल सेना), आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विदर्भ सरसेनापती नंदूभाऊ नरोटे आणि मोहन पुराम यांनी मार्गदर्शन केले.
सभेत गाजलेले प्रमुख मुद्दे -
आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूला जबाबदार कोण? शासकीय आश्रम शाळा, कोटगुल येथील इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी संजना बिरसिंग जाळे हिचा उपचारादरम्यान झालेला संशयास्पद मृत्यू हा सर्वात हळहळणारा मुद्दा ठरला. या प्रकरणी विभागीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
अवैध रिव्हॉल्वर व कॅसिनोवर FIR करा -
कोटगुल परिसरात काही व्यक्ती अवैधपणे रिव्हॉल्वर बाळगून दहशत निर्माण करत आहेत, तर काहीजण अवैध कॅसिनो चालवून तरुणांना बरबाद करत आहेत. अशांवर तात्काळ शस्त्र अधिनियम व जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली.
पाचवी अनुसूचीचा भंग करणाऱ्या घुसखोरांवर कारवाई नाहीतर कोटगुल पेटून उठेल -
पाचव्या अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभेच्या ठरावाशिवाय बाहेरून येऊन अवैधरित्या घरे बांधून व्यवसाय सुरू केलेल्या स्थायी लोकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अन्यथा कोटगुल क्षेत्र पेटून उठेल, असा थेट इशारा विनोद कोरेटी यांनी दिला.
यासोबतच LAMPS कोटगुलच्या दोषी सचिवाचे निलंबन व धान बोनसपासून वंचित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, प्रलंबित वनपट्टे वाटप, आमराईटोला, पाटीलटोला, रामूटोला यांना महसूल गावाचा दर्जा, ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम, ZP शाळांमधील शिक्षक भरती, महिला बचत गटांना कर्ज, ३३ केव्ही उपकेंद्रात अभियंता आणि रस्ते-पुलांचे डांबरीकरण, शिवनाथ नदी उगम स्थानाला क दर्जा पर्यटन स्थळ घोषित करणे, गडचिरोली -धानोरा- मुरूमगाव मार्गे कोटगुल जुन्या वेळापत्रकानुसार बस फेऱ्या सुरू करणे या मागण्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहेत.अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
News - Gadchiroli




Petrol Price




