महत्वाच्या बातम्या

 पिसाळलेल्या कोल्ह्याचा दोन दिवसांत तिघांवर हल्ला : करडी-पालोरा-मुंढरी परिसरात भीतीचे वातावरण


- शेतशिवारात धुमाकूळ रोवणी हंगामात शेतकऱ्यांमध्ये दहशत, वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी 

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील करडी, पालोरा आणि मुंढरी परिसरातील शेतशिवारात पिसाळलेल्या कोल्ह्याने अक्षरशः धुमाकूळ घालत अवघ्या दोन दिवसांत तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले.

सध्या रोवणी हंगाम सुरू असल्याने शेतांमध्ये शेतकरी, महिला व मजुरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिसाळलेल्या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना १४ जुलै रोजी घडली. रुपाली तिरपुडे या पालोरा येथे जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक त्यांच्यावर झडप घालत चावा घेतला. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दुसऱ्या दिवशी,१५ जुलै रोजी मुंढरी खुर्द येथील श्यामकला सोनवणे या आपल्या शेतातील धुऱ्यावरून जात असताना त्यांना कोल्हा दिसला. त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता कोल्ह्याने उलट त्यांच्यावर हल्ला चढवत उजव्या पायाच्या मांडीला चावा घेतला. त्याच दिवशी करडी येथील सुग्रता मेश्राम या शेतात कामासाठी गेल्या असताना त्यांच्यावरही कोल्ह्याने धाव घेत उजव्या भुजेला व कमरेला चावा घेऊन गंभीर जखमी केले.

तिन्ही जखमींना तातडीने करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री मोहनकर तसेच परिचारिका स्वाती सिंगनजुडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील आवश्यक वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली.

रोवणी हंगामामुळे वाढली चिंता -

सध्या तालुक्यात रोवणीची कामे वेगात सुरू असून शेतांमध्ये पहाटेपासून सायंकाळपर्यंत शेतकरी, महिला व मजुरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला शेतमजूर आणि शेतकरी भयभीत झाले असून शेतातील कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वन विभागाने तातडीने कारवाई करावी -

दोन दिवसांत सलग तिन्ही हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित पिसाळलेल्या कोल्ह्याचा तातडीने शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, तसेच परिसरात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करडी, पालोरा आणि मुंढरी परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos