महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत मोबाईल दुकान फोडणारे गजाआड : दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह तिघे ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील रामनगर भागातील माऊली मोबाईल शॉप चे शटर तोडून धाडसी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २२ वर्षीय युवकासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण ११ मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. रोहन व्यंकट दर्रो (२२, रा. मुरमाडी, ता. धानोरा, जि. गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथील रहिवासी अनिरुद्ध दिकोंडवार यांचे रामनगर वॉर्ड क्र. ११ मध्ये माऊली मोबाईल शॉप आहे. २४ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे मोबाईल, ॲक्सेसरीज आणि रोख रक्कम असा एकूण ९८,६९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी २६ मे रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या ठिकाणी चोरट्यांनी कोणताही पुरावा न सोडल्याने पोलिसांसमोर या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत शिताफीने तपास करत रोहन दर्रो व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांच्याकडून चोरीचे १० मोबाईल फोन (किंमत १ लाख रुपये) आणि ५० हजार रुपये किमतीचा १ आयफोन, असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक केलेल्या मुख्य आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि धनराज कोळी, पोउपनि शिवाजी देशमुख, पोलीस अंमलदार गोविंद केकाण आणि राजू कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos