प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ १० ऑगस्ट पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नैसर्गिक आपत्ती, कीड रोग आणि हवामानातील बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी शासनातर्फे प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप हंगाम - २०२६) राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभाग नोंदविण्याची मुदत आता वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांना १० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपला पीक विमा काढता येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा आणि आपल्या पिकांचे संरक्षण निश्चित करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. योजनेचे महत्त्व आणि सद्यस्थिती : अतिवृष्टी, पावसातील खंड, पूर परिस्थिती किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. अशा संकटकाळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पीक विमा हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी कवच आहे. अनेक शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे किंवा वेळेअभावी योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने सहभागाची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे.
नोंदणी कुठे करावी : नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र (CSC) / महा-ई-सेवा केंद्र. ज्या बँकेत शेतकऱ्याचे खाते आहे ती बँक शाखा. पीक विमा पोर्टल (PMFBY Portal) द्वारे स्वतः ऑनलाईन. तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा अधिकृत विमा प्रतिनिधी.
कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खुली आहे. पीक विम्याचे संरक्षण घेतल्यास कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होते. गडचिरोली जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात व्यापक जनजागृती करावी. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी अंतिम तारखेची वाट न पाहता १० ऑगस्ट २०२६ पूर्वी आपला पीक विमा हप्ता भरून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




