जनावरे चराईसाठी नेलेल्या विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू दीड वर्षाच्या चिमुकल्यावरून हरपली आईची माया : हलबीटोला येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : घरची गाई-म्हशी चराईसाठी घेऊन गेलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी तालुक्यातील फुक्कीमेटा ग्रामपंचायत अंतर्गत हलबीटोला येथे घडली. रेखा चोवाराम गुरुपंच २१ वर्ष रा. हलबीटोला, असे मृत विवाहितेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रेखा गुरुपंच या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी घरच्या गाई-म्हशी चराईसाठी घेऊन गावालगतच्या तलाव परिसरात गेल्या होत्या. सायंकाळी जनावरे स्वतःहून घरी परतली; मात्र रेखा घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर गावकऱ्यांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला.
शोधमोहीमेदरम्यान गावालगतच्या तलावात रेखा यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तत्काळ सालेकसा पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास सालेकसा पोलिस करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वीच झाला होता विवाह -
रेखा यांचे माहेर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिबेट कॅम्प टोली येथील असून, दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे पती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संसार नुकताच फुलू लागला असतानाच काळाने घात केला. रेखा यांच्या पश्चात पती आणि अवघा दीड वर्षांचा चिमुकला आहे. आईचे प्रेम आणि मायेचे छत्र हरपल्याने या चिमुकल्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रेखा यांच्या अकाली निधनाने हलबीटोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
News - Gondia




Petrol Price




