गोंडवाना सैनिकी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांचे विद्यालय परिवारात मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांना पुष्पगुच्छ व पुष्प देत स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानामुळे संपूर्ण विद्यालय परिसर उत्साहाने भरून गेला.
यावेळी विद्यालय परिसरात आकर्षक पद्धतीने Back to School या संकल्पनेवर आधारित सुंदर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर नवागत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने छायाचित्रे काढत या अविस्मरणीय क्षणांची आठवण जपली.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय जीवनाची सुरुवात अधिक आनंददायी व्हावी या उद्देशाने पाठ्यपुस्तके, वह्या, नोटबुक, दप्तर तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. नवीन साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवा वर्ग, नवी पुस्तके, नवे मित्र आणि नवी स्वप्ने घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी. शिस्त, नियमित अभ्यास, परिश्रम आणि चांगले संस्कार यांच्या बळावर स्वतःचा तसेच विद्यालयाचा नावलौकिक वाढविण्याचा संकल्प करावा. शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांनाही तितकेच महत्त्व द्यावे.
विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत नियमित उपस्थिती, वेळेचे नियोजन, स्वअनुशासन आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले. नवीन वातावरणाशी जुळवून घेत आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्टरीत्या करण्यात आले होते. आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या मनात विद्यालयाविषयी आत्मीयता निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात झाली.
News - Gadchiroli




Petrol Price




