चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात बैल ठार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये वाघाची दहशत आहे. यामुळे शेतात काम करणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
दरम्यान, भद्रावती तालुक्यातील वायगाव (कुरेकार) येथील एका शेतकऱ्याने शेतशिवारात चरण्यासाठी सोडलेल्या पाच बैलांपैकी चार परत आले, तर एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खरीपूर्व हंगामापूर्वीच बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.
भद्रावती तालुक्यातील इरई धरणाच्या बाधित क्षेत्रातील वायगाव कुरेकार येथील शेतकरी पंडित कुरेकार यांनी आपल्या मालकीचे पाच बैल शुक्रवारी सकाळी शेतशिवारात चरण्यासाठी सोडले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास चार बैल घरी परत आले. मात्र त्यातील एक बैल परत आला नाही. शेतकऱ्यानी गावातील नागरिकांना घेऊन शोधाशोध केला. मात्र, बैल आढळला नाही. त्यानंतर शनिवारी पुन्हा शोध घेतला असता वाघाने बैल फस्त केल्याचे दिसून आले. शिकारीजवळ वाघ गुरगुरत असल्याने ग्रामस्थ परत आले. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता वाघ तिथेच बसून असल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वाघाने शिकार केली तिथे अनेक प्राण्यांना वाघाने फस्त केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. यासंदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली. या घटनेत शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
मागील वर्षीच घेतला गोरावायगाव येथील पंडित कुरेकार यांनी शेतीकामासाठी आनंदवन येथील बैल बाजारातून गोऱ्हा घेतला होता. यावर्षी आपल्या शेतीकामाला तो कामी येईल, अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र त्यापूर्वीच वाघाने त्याला ठार केल्याने शेतकऱ्याला दु:ख अनावर झाले. त्यामुळे परिसरात वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
News - Chandrapur