पळसगाव शिवारात रानटी हत्तींचे ठाण : पाच दिवसांपासून धुडगूस, शेतकरी भयभीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी तालुक्यातील पळसगाव परिसरातील मंजेवाडा भागात गेल्या पाच दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने ठाण मांडल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन धान रोवणीच्या हंगामात हत्तींचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून शेतीची कामे विस्कळीत झाली आहेत.
पळसगाव, मंजेवाडा, सालमारा आणि कराडी परिसरात हत्तींचा मुक्त संचार सुरू असून अनेक शेतांमध्ये घुसून त्यांनी पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचे नवे संकट उभे ठाकले आहे.
सध्या धान रोवणीची कामे वेगाने सुरू असली तरी हत्तींच्या भीतीमुळे अनेक शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. दिवसा तसेच रात्रीही हत्तींचा वावर असल्याने शेतमजूर आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांनी हत्तींच्या भीतीमुळे रोवणीची कामे तात्पुरती थांबविल्याची माहितीही समोर येत आहे.
हत्तींकडून शेतीपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना करून हत्तींचा बंदोबस्त करावा, प्रभावित गावांमध्ये गस्त वाढवावी तसेच नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, हत्तींचा कळप अद्यापही परिसरात असल्याने पळसगाव व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून वन विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




