महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्याचा तातडीने पुरवठा करा; दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही : ॲड. विश्वजीत कोवासे


- कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडल्या खरीप हंगामातील समस्या; दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके तसेच इतर आवश्यक कृषी साहित्याचा तातडीने आणि सुरळीत पुरवठा करण्यात यावा. कृषी साहित्याच्या वितरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला.

ॲड. विश्वजीत कोवासे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरवळकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध कृषी समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी खरीप हंगामासाठी आवश्यक कृषी साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर खते, बियाणे, कीटकनाशके तसेच इतर आवश्यक कृषी साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे. अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतकरी यांच्यात योग्य समन्वयाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी पेरणीची कामेही प्रभावित होत आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक साहित्याअभावी शेतीची कामे खोळंबू नयेत, यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियोजन करून वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणी त्यांनी केली.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असल्याने कृषी साहित्याचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुरवठा साखळीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. शेतकऱ्यांना वेळेवर खते, बियाणे व इतर साहित्य उपलब्ध न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम शेती उत्पादनावर होऊ शकतात, असेही कोवासे यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे तसेच हेमंत मोहितकर आणि विलास ठाकरे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos