राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धासाठी दीड हजार खेळाडू दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर-बल्लारपूर येथे होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे ३४ राज्यांतून १ हजार ५५१ खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यापैकी ७८४ मुले व ६९७ मुली असे एकूण १ हजार ४८१ खेळाडू विद्यार्थी आतापर्यंत चंद्रपुरात दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय चोख व्यवस्था राखण्यात आली असून स्वतः पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या सर्व व्यवस्थांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
चंद्रपुरातील बल्लारपूर येथे २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धा होत आहेत. सहभागी खेळाडूंना कसलाही त्रास होऊ नये आणि या स्पर्धांचा पूर्ण आनंद त्यांना घेता यावा, म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली व्यपस्थापन सांभाळणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे अनेक गट गेले कित्येक आठवडे मेहनत घेत आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विविध बैठकांद्वारे या राष्ट्रीय शालेय क्रिडास्पर्धांसंदर्भातील प्रशासनाच्या विविध कामांत सुसुत्रता, वेग व अचुकता राखत आहेत.
या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धांमधे विविध क्रिडा प्रकारातील २५ राष्ट्रीय विजेते सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थी खेळाडूंचे चमू आणि त्यांचे कोच यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था बल्लारपूर येथे क्रिडा संकुल परिसरात करण्यात आली आहे. तर या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांना भेट देणाऱ्या प्रमुख व्यक्तिमत्वे, राष्ट्रीय खेळाडू, विविध राज्यांतील अधिकारी यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
सुप्रसिद्ध गायक संगीतकार कैलाश खेर यांनी या क्रिडास्पर्धांचे थीम सॉंग तयार केले असून ते समाज माध्यमांवर लोकप्रिय होत आहे.
अशा आहेत स्पर्धा -
२८ डिसेंबर रोजी मुलीं व मुलांच्या गटात प्रथम फेरीसाठी १ हजार ५०० मीटर, ४०० मीटर व १०० मीटर धावण्याची स्पर्धा, १०० मीटर अडथळ्याची शर्यत व ४X१०० रिले शर्यत तरअ-गटाच्या व ब- गटाच्या पात्रता फेरीसाठी थाळी फेक, उंच उडी, गोळा फेक, तिहेरी उडी, या स्पर्धा होणार आहे. तसेच १०० मीटर व ४०० मीटर उपांत्य फेरीचीही लढत होणार असून हतोडा फेक साठी अंतिम लढत रंगणार आहे.
२९ डिसेंबर रोजी प्रथम फेरीसाठी ८०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर अडथळ्याची शर्यत, गट-अ व गट-ब च्या पात्रता फेरीसाठी भाला फेक, थाळी फेक, लांब उडी तरअंतिम फेरीच्या स्पर्धांमध्ये ५ हजार मीटर चालने (मुले), ३ हजार मीटर चालने (मुली), १ हजार ५०० मीटर, ४०० मीटर व १०० मीटर धावण्याची स्पर्धा, ४X१०० रिले शर्यत, थाळी फेक, बांबू उडी, लांब उडी या स्पर्धा होणार आहेत.
२९ डिसेंबर रोजी २०० मीटर उपांत्य फेरी तसेचअंतिम फेरीसाठी क्रॉस क्रंट्री, ४०० मीटर अडथळ्याची शर्यत, उंच उडी, थाळी फेक, हतोडी फेक, ४X१०० व ४X१०० रिले शर्यत, भाला फेक, लांब उडी, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर व ३ हजार मीटर धावण्याची स्पर्धा होणार आहेत.
News - Chandrapur