धावत्या वातानुकुलित ई-बसला भीषण आग : चालकाच्या सतर्कतेमुळे २६ प्रवासी बचावले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोलीहून चंद्रपूरकडे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकुलित ई-बसला गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास चिचपल्ली घंटा चौकीजवळ अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व २६ प्रवासी सुखरूप बचावले असून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४९ बीझेड ४१८७ क्रमांकाची वातानुकुलित ई-बस गडचिरोलीहून प्रवाशांना घेऊन चंद्रपूरकडे येत होती. बसमध्ये चालक पिंपरे व वाहक कोरडे हे कर्तव्यावर होते. चिचपल्ली घंटा चौकी परिसरात बसच्या सीटखालून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
प्रसंगावधान राखत चालकाने तत्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




