महत्वाच्या बातम्या

 प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नवरगावच्या पायल नंदनवार यांची सीए परीक्षेत दैदिप्यमान भरारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव (रत्नापूर-हेटी) येथील रहिवासी पायल बाबूराव नंदनवार यांनी देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून आपल्या गावासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढविला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पायल यांच्या आयुष्यात दहा वर्षांपूर्वी मोठे संकट आले. त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या आईने अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. आईच्या अथक परिश्रमामुळे आणि शिक्षणाविषयीच्या दृढ निश्चयामुळे पायल यांनी उच्च शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली.

चार्टर्ड अकाउंटंटसारख्या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता त्यांनी नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे आईचे अथक कष्ट, कुटुंबातील सदस्यांचा खंबीर पाठिंबा आणि स्वतःची जिद्द हेच महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने सीएसारख्या कठीण परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी पायल यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास प्रेरणेचा आदर्श ठरणार आहे.

पायल नंदनवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नवरगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, नातेवाईक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई आणि कुटुंबीयांच्या मोलाच्या सहकार्याला देत पायल यांनी भविष्यातही प्रामाणिकपणे कार्य करत समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos