महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला उल्लास साक्षरता चाचणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (NILP-उल्लास) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी (FLNAT) रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातही  तालुक्यांमधील ८२६ परीक्षा केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही चाचणी होणार असून, एकूण १२ हजार १९० असाक्षरांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये ७ हजार ३७३ महिला आणि ४ हजार ८१७ पुरुषांचा समावेश आहे.

शिक्षण संचालक (योजना), पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद, भंडारा येथील शिक्षणाधिकारी (योजना) रवींद्र सोनटक्के यांनी दिली.

भंडारा व पवनी तालुक्यांत सर्वाधिक केंद्रे -
तालुकानिहाय नियोजनानुसार, भंडारा तालुक्यात १५९ केंद्रांवर २ हजार ४९८ असाक्षरांची चाचणी घेतली जाणार आहे. मोहाडी तालुक्यात १०६ केंद्रांवर १ हजार ५९९, तुमसर तालुक्यात १३३ केंद्रांवर २ हजार २८५, साकोली तालुक्यात ९७ केंद्रांवर १ हजार ४४२, लाखनी तालुक्यात ८७ केंद्रांवर १ हजार ६७, लाखांदूर तालुक्यात ८२ केंद्रांवर १ हजार ५८५, तर पवनी तालुक्यात १६२ केंद्रांवर १ हजार ७१४ असाक्षरांचे मूल्यमापन होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत परीक्षार्थींनी निर्धारित दिवशी आपापल्या परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे, यासाठी संबंधित यंत्रणेकडून नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होणार आहे.





  Print






Related Photos