मतदारांनो मतदार नोंदणी करा : जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात मतदार नाव नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याकरीता १७ ते १८ वयोगटातील भावी मतदार तसेच १८ वर्षापुढील सर्व मतदार यांची मतदार नोंदणी करण्याचा, नाव दुरुस्त करण्याचा तसेच पत्ता बदलण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तरी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ८ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरु आहे. तरी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याकरीता फॉर्म नं. ६ मयत किया स्थलांतरीत झालेले नावे कमी करण्यासाठी फॉर्म नं. ७, पत्यामध्ये बदल किंवा नावामध्ये दुरुस्ती असेल त्यांसाठी फॉर्म नं. ८ भरुन संबंधित क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी, तसेच ग्रामीण भागातील नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याकरीता संबंधित तालुक्यातील तहसिलदार यांच्याकडे अर्ज सादर करता येतील. तसेच भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे ऑनलाईन देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकता. त्याकरीता www.nvsp.com ही वेबसाईट शासनाने उपलब्ध करून दिले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या दावे व हरकतीविषयी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बैठक आयोजित केली आहे. बैठकीला सर्व मतदार, नागरिक, राजकीय पक्ष यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीशी संबंधित मतदार यादीविषयी काही आक्षेप, तक्रार असल्यास बैठकीमध्ये उपस्थित रहावे. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी करणे, दिव्यांग्यत्वाची नोंद मतदार यादीमध्ये घेण्याकरीता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (डी.डी.आर.सी.), वार्ड क्र. ४९, शासकीय वैद्यकिय रुग्णालय व महाविद्यालय परिसर, नेत्र विभागाच्या बाजुला, हनुमान नगर, नागपूर येथे म.न.पा. झोननिहाय १ ते ६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ४ या वेळेत कॅम्प आयोजित केलेला असून सर्व नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावे. तसेच शिक्षक मतदार संघाचे फॉर्म नं. १९ स्विकारण्याचा कालावधी हा ९ डिसेंबरपर्यंत असून फॉर्म नं. १९ मध्ये अर्ज करताना इयत्ता ९ वी व त्यापुढे शिकवत असलेले सर्व शिक्षक, तसेच मागील ६ वर्षापैकी ३ वर्ष शिकविण्याचा अनुभव असलेले शिक्षक व नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले शिक्षक पात्र आहेत. फॉर्म नं. १९ हे सर्व शाळेतील मुख्याध्यापक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी शिक्षक मतदार त्यांचे फॉर्म नं.१९ भरुन संबंधित सर्व तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी, वि.स.म.संघ यांचे कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) नागपूर येथे फॉर्म नं. १९ भरुन जमा करु शकतील. तरी सर्व मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
News - Nagpur