महत्वाच्या बातम्या

 अखेर नागरिकांनीच सावरला कमलापूर-रेपणपल्ली मार्ग : लोकसहभागातून खड्ड्यांची डागडुजी, संतोष ताटीकोंडावार यांचा पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या कमलापूर-रेपणपल्ली मार्गाची अखेर स्थानिक नागरिकांनीच लोकसहभागातून डागडुजी केली. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी स्वखर्चाने व श्रमदानाच्या माध्यमातून रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून वाहतुकीसाठी मार्ग तात्पुरता सुरक्षित केला. प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

कमलापूर ते रेपणपल्ली हा परिसरातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग असून, दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत होता. अनेक लहान-मोठे अपघात घडत होते, तर चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता आणि खड्डा यातील फरक ओळखणे कठीण झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदने सादर केली. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.

अखेर प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पुढाकार घेत स्थानिक नागरिकांना एकत्र केले. लोकसहभागातून खडी, मुरूम व मातीची व्यवस्था करण्यात आली आणि श्रमदानाच्या माध्यमातून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यात आले. या उपक्रमामुळे वाहतुकीला तात्पुरता दिलासा मिळाला असून नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले आहे.

यावेळी संतोष ताटीकोंडावार म्हणाले, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आणि जनसामान्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी केली. हा उपक्रम प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे.

दरम्यान, या उपक्रमानंतरही नागरिकांनी प्रशासनाकडे कमलापूर-रेपणपल्ली मार्गाची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तात्पुरत्या डागडुजीने समस्या पूर्णपणे सुटणार नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात अशा मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागू नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos