वरोऱ्यात कारची काच फोडून ४ लाखांची रोकड लंपास


- कार्यालयासमोर उभी असलेल्या वाहनातून अज्ञात चोरट्याचा हातसाफ; पोलिसांत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा शहरातील मोकाशे लेआऊट परिसरात भरदिवसा कारची काच फोडून ४ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधाकर तुळशीराम रोहनकर (वय ५०) हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांचा नंदोरी येथे गिट्टी क्रशरचा व्यवसाय आहे. २२ जून रोजी सकाळी त्यांनी एका व्यावसायिक व्यवहारासाठी मेहर ट्रेडिंग कंपनीकडून २ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, यात्रा वॉर्ड शाखेतून आणखी ७ लाख रुपये काढले. अशा प्रकारे त्यांच्या ताब्यात एकूण ९ लाख रुपयांची रोकड होती.
रोहनकर यांनी त्यापैकी ५ लाख रुपये सोबत घेतले आणि उर्वरित ४ लाख रुपये खाकी रंगाच्या पिशवीत ठेवून त्यांच्या रेनॉल्ट कॅप्चर क्रं.एमएच-३४ बीजी-९४९४ या कारच्या मागील सीटखाली ठेवले. कार कार्यालयासमोर लॉक करून ते मित्रासोबत चंद्रपूरला रवाना झाले.
दुपारी सुमारे १.३० वाजता त्यांच्या मुलाने फोन करून कारच्या मागील डाव्या बाजूची काच फुटलेली असल्याची माहिती दिली. व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी केली असता वाहनातील इतर साहित्य जागेवर होते, मात्र ४ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी गायब असल्याचे दिसून आले.
संध्याकाळी रोहनकर कार्यालयात परतल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे वरोरा शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




