सहा गोवंशांची निर्दयी वाहतूक उघड : कोरपना पोलिसांच्या कारवाईत चार आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कोरपना पोलिसांनी धडक कारवाई करीत सहा गोवंशीय जनावरे आणि दोन पिकअप वाहने असा एकूण ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, गोवंशाच्या अवैध वाहतूक व खरेदी-विक्रीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
८ ऑगस्ट २०२६ रोजी कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता कारवाईचे नियोजन केले. संशयित दोन पिकअप वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये सहा गोवंशीय जनावरे निर्दयपणे बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहाही गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. जप्त जनावरांची अंदाजे किंमत ९० हजार रुपये, तर दोन्ही पिकअप वाहनांची अंदाजे किंमत ८ लाख रुपये आहे. त्यामुळे पोलिसांनी एकूण ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९४/२०२६ संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली असून, त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळण्याबाबत न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, अटक आरोपींकडून गोवंशाची वाहतूक नेमकी कुठून करण्यात आली, त्यांची खरेदी-विक्री कोणाकडून केली जात होती आणि या अवैध व्यवहारामागे आणखी कोण व्यक्ती सहभागी आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून गोवंश तस्करीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर तसेच गडचांदूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक लता वाढीवे पोलीस उपनिरीक्षक दत्तहरी जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दीपक, विनीत, पुंडलिक फंड यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




