महत्वाच्या बातम्या

 मोंटफोर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ


- नशामुक्त भारत अभियानांतर्गत १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नशामुक्त भारत अभियान आणि मिशन स्पंदन, ब्रह्माकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानांतर्गत मोंटफोर्ट हायर सेकंडरी स्कूल, बामणी-बल्लारपूर येथे विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्त्या बी. के. स्मिता दीदी, बी. के. विनोद तसेच शाळेचे प्राचार्य ब्रदर प्रेमकुमार यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थितांनी नशेपासून दूर राहण्यासोबतच समाजाला नशामुक्त करण्याचा संकल्प केला.

६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महाअभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये, विशेषतः युवा पिढी व विद्यार्थ्यांमध्ये नशेच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच निरोगी, सक्षम आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी जनसहभाग वाढविणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजावरही गंभीर परिणाम होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली. स्वतः व्यसनांपासून दूर राहणे, कुटुंबीय व मित्रांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे आणि समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

युवा पिढी ही देशाचे भविष्य असून निरोगी आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त, सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मोंटफोर्ट स्कूल, बामणी-बल्लारपूर येथे आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारताच्या संकल्पात सहभागी होत निरोगी, सशक्त आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.





  Print






News - Chandrapur




Related Photos