महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत एलसीबीची मोठी कारवाई : ११ लाखांच्या मुद्देमालासह स्कॉर्पिओ जप्त, एक अटकेत तर दोन फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात पूर्ण दारूबंदी असतानाही चोरट्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने उपपोलीस स्टेशन पेंढरी अंतर्गत मंगेवाडा-पेंढरी रस्त्यावर सापळा रचून ११ लाख ५ हजार ८०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह एका आलिशान स्कॉर्पिओ वाहनावर धडक कारवाई केली. या कारवाईत लखन जोहारी भैसा (वय ४०, रा. बेडगाव, ता. कोरची) या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे साथीदार निर्मल धमगाये आणि तरुण धमगाये (दोघेही रा. कोरची) हे दोघे अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, आरोपी लखन भैसा हा आपल्या साथीदारांच्या मदतीने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने (क्र. सीजी ०८ एआर ५९७६) मंगेवाडा मार्गे पेंढरी परिसरातील किरकोळ दारू विक्रेत्यांना देशी-विदेशी दारूचा पुरवठा करण्यासाठी जात आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने मंगेवाडा ते पेंढरी रस्त्यावर दोन पंचांसह सापळा रचला.

संशयित स्कॉर्पिओ येताना दिसताच पोलिसांनी अडथळा निर्माण करून ती थांबवण्याचा इशारा केला. वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली; मात्र पोलिसांना पाहताच चालकाच्या बाजूला बसलेले निर्मल धमगाये व तरुण धमगाये हे दोघे गाडीतून उतरून पसार झाले. पोलिसांनी चालकाला जागीच पकडून नाव विचारले असता त्याने लखन भैसा असे सांगितले.

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बिअरचा साठा आढळला. यात २८ हजार ८०० रुपये किमतीची १८० मिली मापाची रॉयल स्टॅग विस्की (९६ नग), १ लाख ४४ हजार रुपयांची ५०० मिली मापाची माऊंट ६००० बिअर (४८० नग), ९५ हजार रुपयांची ५०० मिली मापाची लेमऊंट बिअर (३१८ नग), ४८ हजार रुपयांची ७५० मिली मापाची मॅकडोवेल्स नं. १ विस्की (४८ नग), ६० हजार रुपयांची ८० मिली मापाची गोवा विस्की (३०० नग), २८ हजार रुपयांची १८० मिली मापाची मॅकडोवेल्स नं. १ विस्की (९६ नग) आणि ७ लाख रुपये किमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण ११ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.

या प्रकरणी उपपोलीस स्टेशन पेंढरी येथे आरोपींविरुद्ध अप क्र. ३१/२०२६ कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करीत आहेत. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोलीस अंमलदार प्रशांत गरफडे, सचिन घुबडे आणि चालक पोलीस अंमलदार दीपक लोणारे यांनी केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos