महत्वाच्या बातम्या

 स्वीकृत सदस्यांचा विषय अजेंड्यावर नसल्याने सर्वपक्षीय गटनेत्यांचा आक्षेप : महापौरांकडे केली मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत नामनिर्देशित सदस्यांचा विषय समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी शहरातील चार प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांनी महापौर संगीता खांडेकर यांच्याकडे केली आहे. नियमानुसार सर्वसाधारण सभा घेऊन महानगरपालिकेचे कामकाज पारदर्शकपणे चालविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी, काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटनेते राहुल विरुटकर तसेच महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी महापौरांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांचा विषय घेणे कायद्यानुसार आवश्यक असतानाही तो यापूर्वीच्या सभेत घेण्यात आला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

गटनेत्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यापूर्वीची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली होती. आता न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुन्हा सभा आयोजित करण्यात आली असली, तरी ५ ऑगस्टच्या सभेच्या अजेंड्यावरही स्वीकृत सदस्यांचा विषय नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्वीकृत सदस्यांचा विषय सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट करण्यासाठी यापूर्वीही भाजप-शिवसेना शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-बहुजन समाज पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-वंचित बहुजन आघाडी तसेच महानगर आघाडीच्या गटनेत्यांनी महापौर संगीता खांडेकर आणि महानगरपालिका आयुक्त नरेश अकनुरी यांना अनेक वेळा निवेदने दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप गटनेत्यांनी केला.

५ ऑगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडावी, शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर प्रभावी निर्णय व्हावेत आणि महानगरपालिकेचे कामकाज नियमानुसार चालावे, या उद्देशाने महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन स्वीकृत सदस्यांचा विषय अजेंड्यावर समाविष्ट करावा, अशी मागणी गटनेत्यांनी केली. मात्र, याबाबत अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.

महापौरांनी नियमानुसार कार्यवाही करून स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट करावा, यासाठी सर्वपक्षीय गटनेते पुढील काळातही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos