ब्रिक्स शिष्टमंडळाला ताडोबात वाघांचे संस्मरणीय दर्शन : संवर्धन व्यवस्थापनाचे केले कौतुक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रिक्स (BRICS) देशांतील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने रविवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) ला भेट देत जंगल सफारीचा आनंद लुटला. या दौऱ्यात शिष्टमंडळातील सदस्यांना अनेक वाघांचे संस्मरणीय दर्शन घडले. तसेच ताडोबातील वन्यजीव संवर्धन, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि पर्यटन सुविधांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
सुमारे ७० सदस्यांच्या शिष्टमंडळासाठी कोलारा, मदनापूर आणि बेलारा या बफर प्रवेशद्वारांवरून २० हून अधिक सफारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. परदेशी प्रतिनिधींनी मादनापूर प्रवेशद्वारातून तर इतर सदस्यांनी कोलारा आणि बेलारा प्रवेशद्वारांतून जंगल सफारी केली.
सकाळच्या सफारीदरम्यान रशिया आणि इथिओपियाच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध टी-१७८ वाघासह टी-८२ या वाघिणीचे एक उपप्रौढ पिल्लू दिसले. सायंकाळच्या सफारीत दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि इराणच्या प्रतिनिधींना टी-१७८, टी-८२ चे उपप्रौढ पिल्लू तसेच टीएन-९ चे एक उपप्रौढ पिल्लू पाहण्याचा दुर्मिळ अनुभव मिळाला.
वाघांव्यतिरिक्त प्रतिनिधींनी चितळ, सांबर, भारतीय गवा, रानडुक्कर तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचेही निरीक्षण केले. पावसामुळे हिरवाईने नटलेल्या जंगलातील जैवविविधतेचा अनुभव घेताना प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाला अधिवास व्यवस्थापन, शिकारीविरोधी उपाययोजना, स्थानिक समुदायाच्या सहभागातून राबविण्यात येणारे संवर्धन उपक्रम आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपायांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. अनेक प्रतिनिधींनी हा वन्यजीव अनुभव अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली.
या दौऱ्याचे नियोजन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपसंचालक विशाल माळी, सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. दुबे, संकेत वाठोरे, विवेक नातू, तसेच पळसगाव आणि कोलारा परिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहतूक व्यवस्था, पर्यटकांच्या सुरक्षिततेची अंमलबजावणी आणि माहितीपूर्ण मार्गदर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या भेटीमुळे ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली असून, भारतातील अग्रगण्य व्याघ्र संवर्धन क्षेत्र आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ताडोबाची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा छाप पडली.
News - Chandrapur




Petrol Price




