महत्वाच्या बातम्या

 चितळ शिकारीप्रकरणी वनविभागाची धडक कारवाई : दोन आरोपींना अटक


- मार्कडा (कं.) वनपरिक्षेत्रातील गांधीनगर-कोपरल्ली परिसरातील घटना; वनगुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या मार्कडा (कं.) वनपरिक्षेत्रात चितळ शिकारीच्या प्रकरणी वनविभागाच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वन्यजीवांच्या शिकारीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने सक्रिय पावले उचलल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्कडा (कं.) वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र रेंगेवाही आणि नियतक्षेत्र कोपरल्ली अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर-कोपरल्ली परिसरात वन्यप्राण्यांची शिकार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणाची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने कारवाई केली. या कारवाईदरम्यान रामानंद कृष्णपव शिल आणि तपन प्रसाद पंजा या दोघांना १० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपी गांधीनगर, तालुका मुलचेरा, जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी आहेत.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, शिकारीसंदर्भातील पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे करीत आहेत. वन्यजीवांची शिकार नेमकी कोणत्या परिस्थितीत करण्यात आली, यासह प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींचा तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीना आणि सहायक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत मार्कडा (कं.) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे, रेंगेवाहीचे क्षेत्र सहायक व्ही. धात्रक, कोपरल्ली नियतक्षेत्राचे वनरक्षक एस. हजारे आणि मल्लेरा नियतक्षेत्राचे वनरक्षक डी. दुर्गमवार यांनी सहभाग घेतला. वन्यजीवांचे संरक्षण आणि अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून अशा प्रकरणांवर लक्ष ठेवले जात आहे. चितळ शिकारीच्या या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos