भीषण अपघातात इंटरव्ह्यूसाठी निघालेल्या पॉलिटेक्निक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारपुर मार्गावरील रेल्वे लाईन ब्रिजसमोर ५ मे रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजय राधेकिसन शाहू (वय १९), रा. अष्टभूजा वार्ड, रमाबाईनगर, चंद्रपूर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
विजय हा मेकॅनिकल पॉलिटेक्निकचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून BIT कॉलेज, बामणी येथे शिक्षण घेत होता. ५ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजता तो प्लेसमेंट इंटरव्ह्यूसाठी आपल्या मोपेड क्रं. एमएच ३४ बीडब्लू ७९०६ ने घरून निघाला होता. दरम्यान रेल्वे ब्रिजसमोर समोरून येणाऱ्या क्रूझर क्रं. एमएच ३४ एएम ६६५८ वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत विजय हा खाली पडून छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याची आई पूनम शाहू यांनी तातडीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
हुशार व मेहनती विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या विजयचा प्लेसमेंट इंटरव्ह्यूसाठी जात असताना मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी वडील राधेकिसन रामअवतार शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित क्रूझर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार निशिकांत रामटेके करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




