महत्वाच्या बातम्या

 भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर : चंद्रपुरात दक्षता जनजागृती सप्ताह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शासकीय कामांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, तसेच भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासनाच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यंदा या सप्ताहासाठी समृद्धीसाठी सत्यनिष्ठा ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या सप्ताहाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासह शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वेस्थानके, शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत भ्रष्टाचारविरोधी संदेश पोहोचविण्यात येणार आहेत. याशिवाय फेसबुक, व्हॉट्सॲप, एसएमएस तसेच अन्य समाजमाध्यमांचाही जनजागृतीसाठी प्रभावी वापर केला जाणार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

शासकीय कामकाज करताना कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची अथवा अन्य कोणत्याही स्वरूपातील अवैध लाभाची मागणी करीत असल्यास नागरिकांनी दबावाला बळी न पडता तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले आहे.

नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ०७१७२-२५०२५१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच ८३७९९५१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही संपर्क साधता येईल. भ्रष्टाचारमुक्त समाज आणि पारदर्शक प्रशासनाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढाकार घेऊन या जनजागृती अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






Related Photos