पुनर्वसित गावठाणांतील युवकांसाठी मोफत सेवायोजन नोंदणी


- सेवा संकल्प अभियानांतर्गत पवनी तालुक्यात विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने पवनी तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी विशेष सेवायोजन नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महालगाव पुनर्वसन गावठाण (आमगाव) आणि परसोडी पुनर्वसन गावठाण (कोटलपार) येथील ग्रामपंचायतींमध्ये हे शिबिर घेण्यात आले. यावेळी १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना ‘महास्वयंम’ पोर्टलवर निःशुल्क सेवायोजन नोंदणी (Employment Card) करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
१६ उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी -
शिबिरात दोन्ही गावांतील एकूण १९ नोकरीइच्छुक युवक-युवतींनी सहभाग घेतला. त्यापैकी १६ पात्र उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर यशस्वी ऑनलाइन सेवायोजन नोंदणी करण्यात आली. या उपक्रमासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुहास बोन्द्रे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक अतुल पडोळे तसेच नाजमा पठाण यांनी उपस्थित राहून नोंदणीची कार्यवाही पूर्ण केली.महालगाव पुनर्वसन गावठाणच्या ग्रामपंचायत अधिकारी साक्षी वाघमारे आणि परसोडी पुनर्वसन गावठाणचे ग्रामपंचायत अधिकारी मनोज रामटेके यांचे यावेळी सहकार्य लाभले.
पात्र युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन -
पुनर्वसित गावठाणातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. तालुक्यातील उर्वरित सर्व पात्र सुशिक्षित युवक-युवतींनी महास्वयंम पोर्टलवर आपली नोंदणी करून शासकीय योजना तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले.




Petrol Price




