महत्वाच्या बातम्या

 मुलमध्ये बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर धाड : ९.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची अवैध निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि मुल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ९ लाख ८५ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ (वय २७), रा. ताडाळा रोड, मुल असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, मुल येथील आरोपी मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ (वय २७),  हा आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला साठवून ठेवत असून स्वतःच्या घरी बनावट सुगंधित तंबाखूची निर्मिती करीत आहे.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व मुल पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. छाप्यामध्ये बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, यंत्रसामग्री, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एमएच-२७ व्हीके-२९०७ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ८५ हजार ४४५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुढील कार्यवाहीसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास मुल पोलीस स्टेशन करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व मुलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, विनोद भुरले, रूपेश कुंभरे तसेच पोलीस अंमलदार धनराज करकाडे, जयंत चुनारकर, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारपाटे, किशोर वाकाटे, दीपिका सोडणार आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos