अपघातात युवकाचा मृत्यू : मदतीसाठी कुटुंबाची धावपळ, राजकीय उदासीनतेवर अमित नगरवासीयांचा संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात अमितनगर (बामणी) येथील युवक रुपेश संजय भोयर याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर मृत रुपेश भोयर यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आंदोलनात्मक भूमिका घेतली. सोमवारी रात्री सुमारे ११.३० वाजेपर्यंत प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. संबंधितांकडून उद्या आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शविली.
मात्र, मंगळवारी सकाळपासून मृतकाचे नातेवाईक आणि ग्रामस्थ ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे ठिय्या देऊन होते. आर्थिक मदतीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यातही वारंवार संपर्क साधला. दिवसभर पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष आर्थिक मदत न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
सायंकाळी सुमारे ५ वाजता शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुपेश भोयर यांचा मृतदेह बामणी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री ८ वाजता पोलीस ठाण्यात या प्रकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असून, आर्थिक मदत व इतर मागण्यांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, अमितनगर, बामणी येथील नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करत कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मृतकाच्या कुटुंबाची भेट घेतली नसल्याचा आरोप केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, निवडणुका, सभा किंवा रॅली असली की अमितनगरमध्ये वाहने पाठवून लोकांना मोठ्या संख्येने गोळा केले जाते. मात्र आज एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांना धीर देण्यासाठी किंवा मदतीचा हात देण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधी पुढे आला नाही.
या घटनेमुळे अमितनगर व बामणी परिसरात शोककळा पसरली असून, मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




