महत्वाच्या बातम्या

 पैशांच्या व्यवहारातून पोलीस पाटलासह पत्नीवर जीवघेणा हल्ला : अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पैशांच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादात पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीवर लाकडी दांडक्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना चिमूर शहरातील क्रांतीनगर परिसरात घडली. या प्रकरणी चिमूर पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.

प्राप्त माहितीनुसार, खानगाव ता. चिमूर येथील रहिवासी तथा पोलीस पाटील प्रदीप संतोष रामटेके (वय ३७) यांनी परिचयातील महिला भाग्यश्री प्रशांत बावने हिला दोन महिन्यांपूर्वी ७० हजार रुपये दिले होते. सदर रक्कम तसेच सोने-चांदी परत घेण्यासाठी १२ मे रोजी सकाळी ते पत्नी अश्विनी रामटेके यांच्यासह क्रांतीनगर येथे गेले होते.

यावेळी नवनीत राजेंद्र कोसरे याच्याकडे पैसे व दागिने मागितल्याचा राग आल्याने त्याने निलगिरीच्या लाकडाचा दांडका घेऊन प्रदीप रामटेके यांच्यावर हल्ला केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत पाठीवर, हातावर, पायावर व डोक्यावर वारंवार मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी नवनीतचे दोन साथीदारांनीही त्यांना पकडून ठेवत मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नवनीत कोसरेची आई शोभा राजेंद्र कोसरे व बहीण अश्विनी राजेंद्र कोसरे यांनीही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीची पत्नी अश्विनी रामटेके या पतीला वाचविण्यासाठी पुढे आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रदीप रामटेके बेशुद्ध पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर जखमी दाम्पत्याने चिमूर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी चिमूर पोलिसांनी आरोपी नवनीत राजेंद्र कोसरे, शोभा राजेंद्र कोसरे, अश्विनी राजेंद्र कोसरे तसेच दोन अनोळखी आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(s), ३(२)(va), ३(२)(५) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११८(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos