महत्वाच्या बातम्या

 ८२ गावांच्या सुरक्षेचा भार २५ पोलिसांवर : वेलतूर पोलिस ठाण्यात मनुष्यबळाची गंभीर कमतरता


- मंजूर २१ पदे, गरज मात्र ५० ते ६० पोलिसांची; अतिरिक्त ५ अंमलदारांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देणार या शासनाच्या घोषणेची ग्रामीण भागातील वस्तुस्थिती कुही तालुक्यातील वेलतूर पोलिस ठाण्याच्या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे. तब्बल ८२ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वेलतूर पोलिस ठाण्यात मनुष्यबळाची मोठी कमतरता असून, मर्यादित पोलिस कर्मचारी मोठ्या क्षेत्राचा कारभार सांभाळत आहेत.

वेलतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८२ गावे येतात. या विस्तीर्ण आणि संवेदनशील क्षेत्राचा विचार करता येथे किमान ५० ते ६० पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. मात्र, शासनाने या भागाच्या सुरक्षेसाठी केवळ २१ पदांना मंजुरी दिली आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्राच्या तुलनेत ही पदसंख्या अत्यंत अपुरी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

२५ पोलिसांवर ८२ गावांचा भार -
सध्या वेलतूर पोलिस ठाण्यातील उपलब्ध २५ पोलिस कर्मचारी ८२ गावांतील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्यावर नियमित बंदोबस्त, तपास, गस्त आणि विविध प्रशासकीय कामांचा अतिरिक्त भार आहे.

पोलिस ठाण्यात आवश्यक असलेल्या रिक्त जागांमध्ये -

१ सहायक पोलिस उपनिरीक्षक सफौ

२ पोलिस हवालदार / महिला पोलिस हवालदार

३  महिला पोलिस अंमलदार मपोअं

या पदांचा समावेश आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असून, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील आव्हाने वाढली -
वेलतूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शेतीविषयक वाद, अवैध धंदे, वाळू तस्करी, तसेच विविध सण-उत्सवांच्या काळातील बंदोबस्त यांसारखी अनेक आव्हाने आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबतच गुन्हेगारी घटनांचा तपास आणि प्रतिबंध करण्याची जबाबदारीही पोलिसांवर आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने पोलिस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत आहे.

अतिरिक्त ५ पोलिस अंमलदारांची मागणी -

गावे आणि गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता वेलतूर पोलिस ठाण्याने अतिरिक्त ५ पोलिस अंमलदारांची मागणी केली आहे. तसेच गृह विभागाने मंजूर पदसंख्येत वाढ करून ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या व्यक्तींच्या दौऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त उपलब्ध केला जातो; मात्र ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना आहे.

मोठी घटना घडल्यास यंत्रणा कोलमडण्याची भीती -
एखादी मोठी दुर्घटना, गंभीर गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास उपलब्ध २५ पोलिस कर्मचाऱ्यांवर आणखी मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन शासनाने वेलतूर पोलिस ठाण्याच्या मनुष्यबळाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देणे ही केवळ प्रशासकीय गरज नसून, नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos